कर्नाटक भाजप – महाराष्ट्र भाजपमध्ये जुंपली; बसवराज बोमय्यांचे फडणवीसांना जाहीर आव्हान

बल्लारी (कर्नाटक) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान करत आहे. त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांनी म्हटले आहे. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले आहेत. आता भाजपच्यात मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे आव्हान दिले असल्याने फडवणीस आणि राज्य सरकार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा राज्य सरकार तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींनी बुधवारी खोडून काढला. महाराष्ट्रातील एकही गाव राज्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. तसेच बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी भाषिकांची गावे मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे लढा देईल, असा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत फडणवीसांना उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केले असून, त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
ते म्हणाले की कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या राज्यात समाविष्ट केले पाहिजेत. 2004 पासून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत त्यांना यश आलेले नाही आणि मिळणारही नाही. आम्ही कायदेशीर लढ्यासाठी तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.





