‘मी रक्ताने लिहून देतो, डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार’, काँग्रेस आमदारानेच केला दावा; कर्नाटकात महाराष्ट्राची पुनरावृत्ती होणार?

D K Shivakumar | कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षात फूट पडणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून रंगली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्याकडून बंड केले जाण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य कर्नाटक विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी केल्यानंतर या चर्चेने अधिकच वेग पकडला होता. त्यातच आता काँग्रेस आमदाराने डीके शिवकुमार हे लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली आणि काँग्रेस आमदार बसवराजू वी. शिवगंगा यांनी मुख्यमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना पाठिंबा दिला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारतील व पुढील साडेसात वर्षे ते या पदावर असतील, असा दावा वी. शिवगंगा यांनी केला आहे.
‘ही गोष्ट लिहून ठेवा, डिसेंबरपर्यंत हे होणार आहे. तुम्हाला हवे असेल तर मी माझ्या रक्ताने लिहूनही देऊ शकतो की डी. के. शिवकुमार डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री बनतील. जर तसे झाले तर ते या कार्यकाळातील उर्वरित दोन-अडीच वर्षे आणि पुढील एक संपूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री राहतील. म्हणजे एकूण साडेसात वर्षे ते मुख्यमंत्रीपदी असतील., असा दावा काँग्रेस आमदाराने केला आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण कर्नाटक युनिटला एकसंध करण्याचे काम त्यांनी केले. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना देखील हे माहित आहे, असेही शिवगंगा म्हणाले. याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली देखील एका सभेला संबोधित करताना असाच दावा केला होता.
दरम्यान, कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला असल्याची चर्चा आहे. शिवकुमार काँग्रेसमधून बाहेर पडत सरकार पाडतील, असा दावा कर्नाटकातील भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यावर शिवकुमार यांनीही भूमिका स्पष्ट करत हा दावा फेटाळून लावला आहे. काँग्रेस एकजूट असून, भाजपचेच अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.





