प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिकेच्या संभाव्य निवडणुकीची चाहूल लागताच भाजपने उमेदवार निवड प्रक्रियेला वेग दिला आहे. पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज सादर केलेल्या इच्छुकांच्या आज ( शनिवार्फ) तसेच उद्या ( रविवारी) मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पक्षाकडे आता पर्यंत १६५ जागांसाठी सुमारे दोन हजार ३५० कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी अर्ज केले आहेत. अर्ज करणाऱ्यांत माजी नगरसेवकांसह, इतर काही पक्षातील माननियांचा समावेश आहे. या अर्जांची छाननी करण्यात आली असून त्यानुसार, डीपी रस्त्यावरील शहर कार्यालयात मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी दिली. शहराध्यक्षांसह पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. भाजपकडून काही दिवसांपूर्वी निवडणुकांसाठी अर्ज वाटप केले होते. त्यानंतर पक्षाकडे मोठया प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. सुरूवातील पक्षाकडून ही सर्व नावांची यादी प्रदेश कार्यालयास पाठविण्यात येणार होती. मात्र, त्यानंतर अर्जांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने पक्षाने ही नावे थेट न पाठवता, इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांची कामगिरी, जनसंपर्क, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि आरक्षण निकषांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार्फ, सकाळी १० वाजेपासून मुलाखती घेतल्या जाणार असून प्रत्येक वाॅडसाठी कमीत कमी तीन नावांची शिफारस केली जाणार आहे. तीनपेक्षा अधिक सक्षम उमेदवार असल्यास ही संख्या वाढविली जाणार आहे. प्रभागनिहाय अर्ज भाजपकडे एकूण दोन हजार ३०० अर्ज प्राप्त झाले असून त्यात प्रभाग क्रमांक २९ मध्ये सर्वाधिक ७१ अर्ज आले आहेत. प्रभाग क्रमांक २८ मध्ये ६०, तर प्रभाग क्रमांक २४ मध्ये ५८ अर्ज मिळाले आहेत. सर्वात कमी म्हणजे प्रभाग क्रमांक ६ आणि १४ मधून प्रत्येकी १५ अर्ज प्राप्त झाले आहेत. बहुतांश प्रभागांमध्ये अर्जांची संख्या ३०पेक्षा अधिक आहे. सर्वासमोर मुलाखत नको पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्यातरी भाजपमध्ये जाण्यासाठी रांगेत असलेल्या इतर पक्षातील माजी नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे, आमच्या मुलाखती सर्वांच्या सक्षम नको अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काॅग्रेस, काॅग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष , राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक जण भाजपच्या वाटेवर आहेत. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत यांना पक्षात घेण्यावरून मतभेद आहेत. असे असतानाच हे माजी नगरसेवक मुलाखतीस गेल्यास त्यांची नावे उघड होणार आहेत.त्यामुळे, त्यांची नावे थेट पक्षाकडे सुचविली जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.