Devendra Fadnavis : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचं कौतुक करत त्यांना “मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस” असे संबोधले. (Devendra Fadnavis) फडणवीस म्हणाले की, राणेंच्या कामामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव राणेंवर असून त्यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाचा विचार कधीच सोडला नाही. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. आपल्या भाषणात फडणवीस यांनी राणेंसोबत काम करतानाचे अनुभवही सांगितले. विधानसभेत पहिल्यांदा भाषण केल्यानंतर राणेंनी दिलेलं प्रोत्साहन आजही आठवत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. (Devendra Fadnavis) राणेंची अर्थसंकल्पावरील पकड आणि अभ्यासपूर्ण मांडणी उल्लेखनीय असल्याचे सांगत, त्यांनी विरोधी पक्षात असतानाही प्रभावी भूमिका बजावली, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या नेतृत्वामुळे विधानसभेत मोठा दरारा निर्माण झाला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. राणेंच्या कुटुंबीयांचा उल्लेख करताना फडणवीस यांनी नीलम राणे यांच्या पाठिंब्याचे कौतुक केले. तसेच नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये राणेंचा राजकीय वारसा स्पष्टपणे दिसतो, असे त्यांनी सांगितले. कोकणाच्या विकासासाठी राणेंचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत, “ते देशाचे नेते असले तरी त्यांच्या मनात कोकण कायम आहे. त्यांचा १०० वा वाढदिवसही अशाच भव्य पद्धतीने साजरा करू,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis)