Karmoli Road: करमोळीत मुख्य रस्त्यावर भलामोठा खड्डा! नांदगाव-करमोळी मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
Karmoli Road: पावसामुळे रस्त्याची दुरवस्था, दुचाकी अन् चारचाकी चालकांची कसरत; तातडीने दुरुस्ती करण्याची गावकऱ्यांची मागणी.

Karmoli Road: – पौड-कोळवण-काशिग प्रजिमा 26 या मार्गावरील करमोळी व नांदगाव परिसरात रस्ता खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. वाहनचालकांना हा खड्डा लांबून स्पष्ट दिसत नसल्याने भरधाव येणारी वाहने अचानक खड्ड्यात आदळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
करमोळी व नांदगावदरम्यान साधना व्हिलेजजवळील रस्त्यावर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ता तयार करताना जुने गतिरोधक हटविण्यात आले होते. 25 जुलैनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे याच ठिकाणी रस्ता खचला असून मोठा खड्डा निर्माण झाला आहे. रस्त्याची पृष्ठभागाची पातळी खचल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
जानेवारी महिन्यात याच मार्गावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा पार पडली होती. स्पर्धेच्या निमित्ताने पौड-कोळवण-काशिग रस्ता रुंद करण्यात आल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. रुंद रस्त्यामुळे अनेक वाहने वेगाने धावत असताना अचानक समोर येणार्या खड्ड्यामुळे वाहनचालकांचा ताबा सुटण्याची शक्यता आहे.
नांदगाव व करमोळी परिसरात रस्ता खचल्याने दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्डा स्पष्ट दिसत नसल्याने धोका आणखी वाढत आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी खचलेल्या भागाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
“नांदगाव व करमोळी येथील खचलेल्या रस्त्याची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे.”
– संकेत साळुंके, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मुळशी
“पौड-कोळवण रस्त्याने दररोज प्रवास करतो. नांदगाव येथील रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून बांधकाम विभागाने त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता आहे.”
– गणेश पटेकर, व्यावसायिक, कोळवण





