Service Road: मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील सर्व्हिस रोड खड्ड्यात! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
Service Road: दररोज हजारो आयटी व्यावसायिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला; पीक अवर्समध्ये होणाऱ्या भीषण ट्रॅफिक जाममुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट.

Service Road – मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वाकड ते रावेत दरम्यानच्या सर्व्हिस रोडची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ व संथ कारभारामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वाकड चौक ते भूमकर चौक, ताथवडे, पुनावळे आणि रावेत या मार्गावरील सर्व्हिस रोडचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, या कामाचा संथ वेग आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या अपुऱ्या उपाययोजनांमुळे हा रस्ता आता अपघाताचे मुख्य केंद्र बनला आहे. नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून प्रशासनाकडून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचे जाळे यामुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे. हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनलजवळील साई आर्केड सोसायटीसमोरील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात चिखलमिश्रित पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था न केल्याने रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. दुसरीकडे, भूमकर चौकाजवळील रॉयल ओक सोसायटीसमोरील सर्व्हिस रोड पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.
खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार येथे घसरून पडत आहेत. त्यातच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा आणि बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आला आहे. पावसामुळे हा राडारोडा आणि माती रस्त्यावर पसरल्याने रस्ता प्रचंड निसरडा झाला असून, वाहन घसरून गंभीर अपघात होण्याची भीती वाढली आहे. यामुळे वाहनचालक आणि स्थानिकांचे हाल होत आहे.
हा सर्व्हिस रोड वाकड, हिंजवडी आयटी पार्क, ताथवडे आणि रावेत परिसराला जोडणारा प्रमुख अंतर्गत मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दररोज हजारो आयटी व्यावसायिक, शाळकरी विद्यार्थी आणि नागरिक प्रवास करतात. मात्र, रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, सकाळी आणि संध्याकाळी पीक अवर्समध्ये येथे मोठी वाहतूक कोंडी होत आहे.






