Solapur News : करमाळा तालुक्यातील विहाळ गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून संतापलेल्या नातीनं आपल्या ८२ वर्षीय आजीची बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Solapur News) जनाबाई भगवान सुरवसे (वय ८२) असे मृत वृद्ध महिलेचे नाव असून त्या अर्धांगवायूने त्रस्त होत्या. त्या वारंवार तक्रार करत असल्याने नाती मनिषा रविंद्र लवंगारे (वय ३६) हिला राग आला. “तू वारंवार किरकिर का करते?” या कारणावरून उशिरा रात्री तिने आजीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही तर आजीचं डोकं भिंतीवर आपटल्याने त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडल्या. (Solapur News) या प्रकरणी सुरुवातीला करमाळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पुढील तपासात संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी आणि त्यांच्या पथकाने तपास करत वैद्यकीय अहवालाच्या आधारे मनिषा लवंगारे हिला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबातील वादातून घडलेल्या या क्रूर कृत्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. (Solapur News)