Hingoli Farmer Suicide: हिंगोलीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांच्या तगाद्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा नातेवाईकांचा आरोप
Hingoli Farmer Suicide: मयत शेतकरी गोरख बबन पातळे (वय २५, रा. धनगरवाडी) यांच्याकडे सुमारे अडीच एकर शेती असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.

Hingoli Farmer Suicide: हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १४ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. शेतात प्रत्यक्षात विहीर खोदली नसताना अनुदानाची रक्कम उचलल्याप्रकरणी पोलिसांकडून पैसे भरण्याचा तगादा लावण्यात येत असल्यानेच हा टोकाचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मयत शेतकरी गोरख बबन पातळे (वय २५, रा. धनगरवाडी) यांच्याकडे सुमारे अडीच एकर शेती असून त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्या शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सिंचन विहिरीचे काम झाले नसतानाही काहींनी कागदोपत्री विहीर पूर्ण झाल्याचे दाखवून सुमारे २ लाख ३४ हजार रुपयांचे अनुदान उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकाराची माहिती गोरख पातळे यांना नव्हती, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित रक्कम भरण्यासाठी पोलिसांकडून तगादा लावण्यात येत होता. त्यामुळे गोरख पातळे हे काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, उपनिरीक्षक राठोड यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह खाली उतरवू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त केला. पोलिसांनी मयताच्या कुटुंबीयांशी चर्चा करून समजूत काढल्यानंतर रात्री सुमारे आठ वाजता मृतदेह खाली उतरवण्यात आला.
तथापि, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून पैसे भरण्यासाठी दबाव टाकणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे.
कारवाईसाठी आंदोलनाचा इशारा –
या प्रकरणात निर्दोष शेतकऱ्यावर पोलिसांकडून विनाकारण दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करत सर्व संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा गजानन कावरखे, संदेश देशमुख आणि नामदेव पतंगे यांनी दिला आहे.





