Karjat Traffic: कर्जतकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; ‘या’ दोन महत्त्वाच्या उड्डाणपुलांना अखेर मंजुरी
Karjat Traffic: खासदार सुनील तटकरे आणि 'महारेल'च्या बैठकीत निर्णय; माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा.

Karjat Traffic – शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रेल्वे मार्गामुळे निर्माण होणारे अडथळे आणि पर्यटनाच्या काळात वाढणारी वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण उड्डाणपूल प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. कर्जत-मुरबाड मार्गावरील कर्जत चार फाटा आणि गुंडगे-आकुर्ले येथे हे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. कर्जतच्या वाहतूक प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला या निर्णयामुळे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात खासदार सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) तसेच संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक झाली. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैस्वाल यांनी संबंधित उड्डाणपूल प्रकल्पांना मंजुरी दिली. महारेलकडून कर्जत नगरपरिषदेला प्रस्तावित उड्डाणपुलांव्यतिरिक्त आवश्यक असलेल्या पर्यायी उड्डाणपुलांची माहिती मागविण्यात आली होती.
त्यानुसार नगरपरिषदेने चार फाटा आणि गुंडगे-आकुर्ले येथील उड्डाणपुलांची मागणी केली होती. या प्रस्तावांचा विचार करून दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे कर्जतची सध्याची वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासोबतच भविष्यातील वाढती लोकसंख्या, पर्यटन आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधा उभारण्यास मदत होणार आहे. कर्जतच्या वाहतूक आणि रेल्वे पूल प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
अखेर दोन महत्त्वपूर्ण उड्डाणपुलांना मंजुरी मिळाल्याने कर्जतकरांच्या अनेक वर्षांच्या मागणीला मूर्त रूप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी बैठकीस महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैस्वाल, खासदार सुनील तटकरे, सुधाकर घारे, नगराध्यक्षा पुष्पा दगडे, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, गटनेता तथा सभापती महेंद्र चंदन, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, जिल्हा संघटक पंकज पाटील, माजी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे आदी उपस्थित होते.
चार फाट्यावर १०० कोटींचा उड्डाणपूल
कर्जत-मुरबाड मार्गावरील चार फाटा परिसरातील प्रस्तावित उड्डाणपूल ६५० मीटर लांबीचा आणि दोन मार्गिकांचा असणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १००.५९ कोटी रुपये आहे. कर्जत शहरात प्रवेश करणाऱ्या आणि माथेरानसह परिसरातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या विकेंडला मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे चार फाटा परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
गुंडगे-आकुर्ले उड्डाणपूलही महत्त्वाचा
कर्जत-गुंडगे-आकुर्ले मार्गावरील प्रस्तावित उड्डाणपूलही ६५० मीटर लांबीचा असणार असून, त्यासाठी अंदाजे ७९.१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या पुलामुळे भिसेगाव, गुंडगे आणि परिसरातील नागरिकांना कर्जत शहरात येण्यासाठीचा वळसा कमी होणार आहे. बाजारपेठ, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन कामांसाठी कर्जतला येणाऱ्या नागरिकांचा वेळ व प्रवासाचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.






