Karjat Resort Theft – तालुक्यातील चौक-कर्जत मार्गावरील खैराट गावाजवळील एका रिसॉर्टमध्ये विवाह सोहळ्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या लॉकरमधील सोन्या-हिऱ्यांचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या तिघांना खालापूर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून एकूण १८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथील फिर्यादी आपल्या पत्नी व नातेवाईकांसह विवाह सोहळ्यासाठी संबंधित रिसॉर्टमध्ये आले होते. त्यांना राहण्यासाठी रूम देण्यात आली होती. रूममधील लॉकरमध्ये त्यांनी सोन्या-हिऱ्यांचे दागिने व ६५०० रुपये रोख ठेवले होते. हळदी समारंभासाठी बाहेर गेल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी रूमचा दरवाजा उघडून मास्टर पासवर्डच्या साहाय्याने लॉकर उघडत १८ लाख ७० हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली. या प्रकरणी २७ फेब्रुवारी रोजी खालापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत रिसॉर्टमधील सिक्युरिटी गार्ड व रूमबॉय यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मयूर किसन आगिवले (वय २४), प्रवीण कृष्णा सगणे (वय २५) व ओमकार दत्ता सरोदे (वय २५) यांना मंगळवारी (दि. ३ मार्च) अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले १८,७०,००० रुपयांचे सोन्या-हिऱ्यांचे दागिने व ६५०० रुपये रोख असा एकूण १८,७६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार व त्यांच्या पथकाने केला.