प्रभात वृत्तसेवा खालापूर – खालापूर तालुक्यासह परिसरात मानवनिर्मित वणव्यांचे वाढते प्रकार हे निसर्गसौंदर्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे जैवविविधता आणि पर्यावरणासाठी ही बाब अत्यंत चिंताजनक ठरत आहे. दरवर्षी रस्ते विकास, वाढते शहरीकरण, औद्योगिक प्रकल्प आणि खाणकामाच्या नावाखाली हजारो वृक्षांची तोड होत असताना, त्यातच मानवनिर्मित वणव्यांची भर पडल्याने आधीच कमी झालेल्या जंगलावर आणखी मोठा घाला बसत आहे. या आगीत वन्यजीव आणि पशुपक्षी होरपळून मृत्युमुखी पडत असून, नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.खालापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये दिवसाढवळ्या वणवे लावले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः शेतजमिनी साफ करण्यासाठी, माळरान मोकळे करण्यासाठी किंवा शिकार व इतर गैरकृत्यांसाठी मुद्दाम आग लावली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. या मानवनिर्मित वणव्यांमुळे केवळ जंगलच नव्हे, तर संपूर्ण परिसरातील वातावरणावरही विपरीत परिणाम होत आहे. धुरामुळे हवेची गुणवत्ता घसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.पूर्वी झाडांच्या फांद्या घासल्या जाऊन वणवे लागत होते. मात्र सध्याच्या काळात बहुतेक वणवे हे मानवनिर्मित असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरीकरण, बेकायदेशीर शिकार, खाणकाम, तसेच काही ठिकाणी दुर्लक्षामुळे आग लावली जाते. परिणामी घनदाट जंगलांसह ओसाड माळरान, शेतजमिनी आणि डोंगररांगा या आगीच्या विळख्यात सापडत आहेत.या वणव्यांमध्ये मोठ्या वृक्षांसह नव्याने उगवलेली लहान रोपेही जळून जात आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षांत जंगल पुनरुज्जीवनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात अडथळ्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक दुर्मिळ वन्यजीवांच्या जातींचे अधिवास नष्ट होत असून, त्यांचे अस्तित्वच धोक्यात येत आहे.वनविभागाकडून दरवर्षी वणव्यांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येतात. परंतु वणव्यांच्या घटनांमध्ये अपेक्षित घट होताना दिसत नाही. उलट काही ठिकाणी नागरिकांकडून या उपायांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे मानवनिर्मित वणवे हे वनविभागासाठी डोकेदुखी ठरत आहेत.पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, जर वेळीच या वणव्यांवर नियंत्रण मिळवले नाही, तर भविष्यात जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. जमिनीची सुपीकता कमी होणे, पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होणे आणि हवामानातील असमतोल वाढणे, अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. एकूणच तालुक्यातील वाढत असलेले मानवनिर्मित वणवे हे निसर्गसौंदर्याच्या मुळावर उठले असून, यावर तातडीने कठोर उपाययोजना राबवणे अत्यावश्यक झाले आहे.