Karjat Municipal Council : पावसाळ्यापूर्वी नगरपरिषदेचा मोठा ॲक्शन प्लॅन; ‘या’ मोहिमेमुळे नागरिकांना मिळणार दिलासा
Karjat Municipal Council : पावसाळ्यातील संभाव्य अपघातांचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल; नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांच्यासह स्थानिक नगरसेवकांकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी.

Karjat Municipal Council – कर्जत नगरपरिषदेच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला असून या कामांना सध्या वेग आला आहे. शहरातील खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने दुरुस्ती मोहिम सुरू केली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेले रस्ते आणि पावसाळ्यापूर्वी निर्माण झालेल्या अडचणींमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागांमध्ये खड्डे बुजविणे, डांबरीकरण तसेच खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधित प्रभागातील नगरसेवक स्वतः या कामांवर लक्ष ठेवत असून कामाचा दर्जा चांगला राहावा यासाठी प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. या कामांची पाहणी करताना नगराध्यक्ष पुष्पा दगडे, नगरसेविका जान्हवी देवघरे, सुचिता खोत, मानसी कानिटकर,
नगरसेवक अशोक राऊत, कुमेश मोरे आणि महेंद्र चंदन (पाटील) आदी उपस्थित होते. त्यामुळे रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांकडून, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती होत असल्याने मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच नगरपरिषदेकडून आगामी काळातही शहरातील इतर विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





