PMC News : महापालिकेचा ‘चमत्कार’ की फसवणूक? १५ दिवसांत ९०% नालेसफाईचा दावा; प्रत्यक्षात मात्र…
PMC News : सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचा ९०% सफाईचा दावा फोल; नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग कायम असल्याने प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह.

PMC News – महापालिका प्रशासनाने यावर्षी निविदांना उशीर झाल्याचे कारण देत पावसाळी कामांना मान्यता घेण्याआधीच कामे सुरू केली आहेत. त्यातच, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने अवघ्या १५ ते २० दिवसांत तब्बल ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याच वेळी या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या अनेक नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने सफाई कामाच्या केवळ बुडबुड्याचं असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर, उपनगरांत सुरू असलेल्या नालेसफाई आणि पावसाळी कामांचा आढावा अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी घेतला होता. या बैठकीत सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या हद्दीतील नाल्याची सफाई ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.
तर, इतर १२ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ३० ते ३५ टक्के कामे पूर्ण झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. विश्रामबाग आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ५ ते ६ टक्के काम झाले असल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयांनी दिली असल्याचे कौर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
निविदा मंजूरी आधीच
महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पावसाळी गटारांची स्वच्छता करण्यासाठी निविदा काढली जाते. यापूर्वी हे काम मलनिःसारण विभागातर्फे केले जात होते. यंदा परिमंडळ स्तरावर या निविदा काढल्या असून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शहरात सुमारे ४३३ नाले असून, त्यांची लांबी ६२५ किलोमीटर इतकी आहे. पण, ज्या भागात आवश्यकता आहे तेथील नाले, कलव्हर्ट स्वच्छ केले जातात.
कचरा, राडारोडा बाजूला काढला जातो. जे नाले स्वच्छ केले जातात त्यापैकी २०० कि.मी. लांबीच्या नाल्यांची स्वच्छता केली जाते. ही कामे प्रशासनाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू केली आहेत. मात्र, त्यांच्या निविदांना अद्यापही स्थायी समितीची मान्यताच नाही, असे असताना दोन आठवड्यातच ३० ते ४० टक्के कामे झाली असताना उर्वरीत कामेही पुढच्या दोन आठवड्यातच पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे खरंच सफाई झाली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
“शहरातील नालेसफाईचे काम सरासरी ३० ते ४० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामेही लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने ९० टक्के काम झाल्याचे सांगितले आहे. मात्र, त्याभागातील तक्रार असल्याने त्याची माहिती घेतली जाईल.”
– पवनी कौर, अतिरिक्त आयुक्त






