PMC Notice – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक आणि राहण्यास अयोग्य ठरलेल्या इमारती (वाडे आणि जुनी बांधकामे) त्वरित रिकाम्या करण्याचे आवाहन महापालिकेच्या शहर अभियंता विभागाने केले आहे. अशा ३६ मिळकतींमधील रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, जीवितास धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, या इमारती पावसाळ्यात कोसळल्यास त्याची कोणतीही जबाबदारी महापालिकेवर असणार नाही, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या वाड्यांना महापालिकेकडून धोकादायक असल्याचे फलक तसेच नोटिसाही लावण्यात आलेल्या आहेत. शहरात मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात जुने वाडे आहेत. या वाड्यांचे दरवर्षी महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येते. त्यानंतर धोकादायक वाड्याच्या दुरुस्तीसाठी मालकांना नोटीस देण्यासोबतच अतिधोकादायक वाडे उतरविले जातात. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम २६८ (बी) व (सी) अन्वये संबंधित मालक, भाडेकरू व रहिवाशांना घरे तत्काळ खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटीस दिल्यानंतरही संबंधित नागरिक राहिल्यास ते स्वतःच्या जबाबदारीवर राहतील, तसेच अपघात झाल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, धोकादायक भागांची दुरुस्ती मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील तरतुदीनुसार परवानाधारक वास्तुविशारद किंवा स्ट्रक्चरल अभियंत्यांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, इमारत कोसळल्यास तत्काळ महापालिकेच्या नियंत्रण कक्ष (०२०-२५५०१०००) किंवा अग्निशमन दलाच्या क्रमांकावर (१०१) संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.