इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहर स्वच्छता आणि जनजागृती अभियानाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक ५ मधील अंबिका नगर परिसरातील महादेव मंदिर परिसरातून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. परिसरातील मोकळ्या जागेत साचलेला कचरा हटवून स्वच्छता करण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रभावी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. नगराध्यक्ष भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक अक्षय सूर्यवंशी व नगरसेविका दीप्ती राऊत यांच्या वार्ड क्रमांक ५ मधील पुढाकारातून या अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश पवार, नगरसेवक पोपट शिंदे, उमेश मखरे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील राऊत, भारत शिंदे, अमर नलावडे, अजिंक्य जावीर, माजी नगरसेवक जावेद शेख तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. आर्यमान गानबोटे तसेच बालकलाकार ओम कारंडे यांच्या संकल्प पथनाट्य टीमने स्वच्छतेच्या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करत नागरिकांना स्वच्छतेचा अनोखा संदेश दिला. स्वच्छ परिसर, सुंदर इंदापूर” हा संदेश या पथनाट्यातून प्रभावीपणे मांडण्यात आला. पथनाट्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा. उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ होतो आणि विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करून इंदापूर शहर अधिक सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहण नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले. नगराध्यक्ष शहा म्हणाले, “इंदापूर नगरपरिषद राज्य पातळीवर स्वच्छतेत आदर्श ठरावी, हा आमचा संकल्प आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृती अभियान सातत्याने राबविण्यात येणार आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून इंदापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” हेही वाचा : Satara: समर्थ रामदास हे खऱ्या अर्थाने कार्पोरेट ट्रेनर, मयूर भावे; वसंत व्याख्यानमालेच्या समारोपात व्याख्यान