Karisma Kapoor : संजय कपूरच्या संपत्तीवर वाद: करिश्मा कपूरच्या मुलांनी दिल्ली हायकोर्टाचा ठोठावला दरवाजा

Karisma Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच ती आपली मुलं समायरा आणि किआनसोबत दिल्ली हायकोर्टात दिसली. कारण आहे, तिचा माजी पती संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर उभा राहिलेला संपत्तीवरील वाद.
३० हजार कोटींच्या संपत्तीवर तंटा
संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवर मोठा वाद सुरु आहे. या वादात संजयची आई आणि पत्नी प्रिया कपूर यांच्यात वाद सुरू असतानाच आता करिश्मा कपूर व त्यांच्या मुलांनीही कायदेशीर पावलं उचलली आहेत.
करिश्मा आणि तिच्या मुलांनी कोर्टात याचिका दाखल करून प्रिया कपूरवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. त्यांचा दावा आहे की प्रिया, २१ मार्च २०२५ चे जे मृत्युपत्र दाखवत आहे, ते खोटं आहे.
याचिकेत काय मागणी?
करिश्मा कपूरच्या मुलांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी स्पष्टपणे वडिलांच्या मालमत्तेचा बरोबरीने हक्क मागितला आहे. त्यांचे म्हणणे आहे की :
वडिलांच्या मालमत्तेचे योग्य विभाजन व्हावे.
तिचे पूर्ण हिशोब आणि माहिती सादर केली जावी.
मालमत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये यावर न्यायालयाने बंदी घालावी.
त्यांचा आरोप आहे की प्रिया कपूरने अनेक महत्त्वाची माहिती लपवली आहे, आवश्यक कागदपत्रं देण्यास नकार दिला आहे आणि संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रिया कपूरवर गंभीर आरोप
याचिकेत आणखी म्हटलं आहे की, संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर बराच काळ मृत्युपत्र नाकारल्यानंतर अचानकच ते मृत्युपत्र समोर ठेवण्यात आले. त्यामुळे तिच्या खरेपणाबद्दल शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रिया कपूरने शपथ घेऊन कोर्टात स्पष्ट करावं की संजय यांच्या मृत्यूसमयी मालमत्तेची खरी स्थिती काय होती आणि नंतर त्या मालमत्तेबाबत त्यांनी कोणती पावलं उचलली.
आता न्यायालय या प्रकरणात काय निर्णय घेते आणि प्रिया कपूरची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




