कराडच्या युवकाला नोकरीच्या अमिषाने साडेसहा लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा

कराड – ऑनलाइन काम देण्याची बतावणी करून, आपली साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद तुषार मच्छिंद्र शिंदे (रा. मार्केट यार्ड, शनिवार पेठ, कराड) याने कराड शहर पोलीस ठाण्यात दिली असून, अज्ञातावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, तुषार शिंदेला सोशल मीडियावर ऑनलाइन काम देणार असल्याचा मेसेज आला होता. त्याने मेसेजला उत्तर देत ऑनलाइन काम करण्यास सहमती दर्शवली. संबंधितांनी सुरुवातीला त्याला कामाचा मोबदला दिला. मात्र, त्यानंतर त्यांनी तुषारला काही रक्कम भरायला सांगितले. त्यानुसार तुषारने काही रक्कम पाठवली. मात्र, आणखी काम पाहिजे असेल, तर आणखी पैसे द्यावे लागतील, असे त्याला सांगण्यात आले.
त्यानुसार तुषारने समोरच्या व्यक्तींनी केलेल्या मेसेजनुसार वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने तब्बल साडेसहा लाख रुपये भरले. त्यानंतरही पैशांची मागणी वाढत गेल्याने तुषारला संशय आला. त्याने संबंधितांकडे पैसे परत मागितले असता, त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तुषारने फिर्याद दाखल केली.





