Karad News : पाइपलाइनसाठी खोदलेल्या चरीत मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. कराड तालुक्यातील उंडाळे गावात ‘ठाकराची मळी’ नावाच्या शिवारात शनिवारी दुपारी ही घटना घडली. किरण बाजीराव चव्हाण (वय ३०) व अमर रंगराव वडार (वय ३०, दोघेही रा. मनव) अशी मृत झालेल्याची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उंडाळे येथील ठाकराची मळी नावाच्या शिवारात शनिवारी दुपारी पाइपलाइनचे काम सुरू होते. त्यासाठी जेसीबीच्या साह्याने १० ते १२ फूट खोल चर खोदण्यात आली होती. किरण चव्हाण व अमर वडार हे दोघेजण या खोदलेल्या चरीत सिमेंटच्या पाईप जोडण्याचे काम करीत होते. त्यावेळी जेसीबी ऑपरेटरसह इतर काही जण जेवायला झाडाखाली बसले. काही वेळानंतर किरण व अमर या दोघांचा कसलाच आवाज येत नसल्याने सर्वजण चरीकडे गेले. त्यावेळी चरीमध्ये मातीचा ढिगारा कोसळल्याचे त्यांना दिसले. किरण आणि अमर त्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता वाढल्यामुळे सर्वांनी माती बाजूला केली. त्यावेळी दोघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघांनाही उंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.