कराड पालिकेचे पडघम : पक्षीय राजकारणापेक्षा आघाड्यांचेच राजकारण रंगणार

संजय पाटील / कराड : कराड नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असले तरी ही निवडणूक पक्ष पातळीवर होणार की आघाड्यांचे राजकारण रंगणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक शड्डू ठोकून मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. पक्षीय चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न आहेत. मात्र, महायुतीमधील इतर पक्षांची भूमिका वेगळी आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनाही पक्षीय निवडणूक नको आहे. त्याअर्थी कराड पालिकेसाठी आघाड्यांचे राजकारणच रंगण्याची चिन्हे आहेत..
कराड नगरपालिकेत गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे. या- ना – त्या कारणामुळे पालिकेची निवडणूक लांबणीवर पडत आली आहे. अखेर दोन महिन्यांपूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काही महिन्यात घेण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिली. त्यानुसार निवडणूक आयोगानेही मतदार याद्यांसह प्रभाग रचना, आरक्षण सोडत यासाठी कार्यक्रम आखले आहेत.
टप्प्याटप्प्याने हे कार्यक्रम सुरू आहेत. तीन- चार महिन्यात पालिकेची निवडणूक होणार आहे. मात्र, त्याआधीच कराड पालिकेतील माजी नगरसेवकांसह इच्छुकांनीही आपणच नगरसेवक झाल्याचे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने आखाडीसह विविध कार्यक्रमांमध्ये भावी नगरसेवकांचा वावर वाढला आहे. काहीही करून यंदा पालिकेत ‘एन्ट्री’ मारायचीच, या जिद्दीने भावी नगरसेवक कामाला लागले आहेत.
पालिकेच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तसेच जनशक्ती आघाडी, लोकसेवा, यशवंत विकास आघाडी या आघाड्यांच्या माध्यमातूनही पुढील रणनीती ठरविली जात आहे. त्यासाठी विविध बैठकांचे सत्रही सुरू आहे. पालिकेची ही निवडणूक पक्षीय पातळीवर व्हावी, असे भाजपला वाटत असले तरी भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या महायुतीच्या पदाधिकार्यांना हे रूचेनासे झाले आहे.
आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक व्हावी, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीमध्येही याहून वेगळे काही नाही. त्यांचेही पदाधिकारी व कार्यकर्ते आघाडीच्या माध्यमातून निवडणुका होण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे महायुतीतील इतरांना सामावून घेत भाजप आघाडीचे राजकारण करणार की कमळ उमलण्यासाठी पक्षीय धोरण स्वीकारणार, हे येणार्या काळात कळेल.
आघाडीच्या नेत्यांनी लावली ‘फिल्डिंग’
कराड पालिकेच्या राजकारणात यापुर्वी जनशक्ती, लोकशाही, यशवंत विकास आणि जनसेवा विकास या आघाड्यांचा करिष्मा पाहयला मिळाला आहे. या आघाड्यांतील प्रमुख नेत्यांसह दुसर्या फळीतील पदाधिकारी सध्या आगामी निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरण्यासाठी चाचपणी करीत आहेत. पालिकेची आतापर्यंतची राजकीय वाटचाल पाहता यावेळीही पूर्ण बहुमताने कोणतीच आघाडी किंवा पक्ष पालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध करू शकणार नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सर्व आघाड्यांतील प्रमुख नेते आतापासूनच कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
‘ते’ फलक… चर्चा तर होणारच!
१. काही दिवसांपूर्वी वाखाणात आयोजित आखाडीच्या कार्यक्रमावेळी लोकशाही आघाडीच्या एका इच्छुकाने माजी मंत्री आणि दक्षिणेतील आजी आमदाराचा फोटो असलेले बॅनर ठिकठिकाणी लावले होते. हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत.
२. जनशक्ती आघाडीचे सर्वेसर्वा अरूण जाधव यांच्या वाठारमधील पेट्रोल पंपाचे उद्घाटन गेल्या आठवड्यात झाले. या कार्यक्रमाला कराड उत्तर व दक्षिणच्या दोन्ही आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात दक्षिणच्या आमदारांनी बोलताना अरुणदादांनी आमच्याबरोबर यावे, असे जाहीर व्यासपीठावर सांगून चेंडू अरुण जाधव यांच्या कोर्टात टोलवला.
३. जनशक्ती आघाडीच्या प्रमुखांना भाजपकडून ‘ऑफर’ मिळाली आहे. मात्र, आघाडीतील इतरांची भूमिका काय राहील, ते कोणता निर्णय घेतील यावर सगळे अवलंबून आहे. सध्यातरी अरुण जाधव यांच्यासह जनशक्ती आघाडीच्या अन्य नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.


