Alliance politics : स्वातंत्र्य मिळाल्यापासून १९८० च्या दशकाच्या अखेरपर्यंत देशात एकपक्षीय राजवट होती. कॉंग्रेस हा सर्वशक्तीमान पक्ष होता. मात्र ८० चे दशक संपता संपता काही राज्यांमधील मतदारांवरची कॉंग्रेसची पकड सैल होत गेली. प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. प्रादेशिक नेत्यांचा दबदबा निर्माण झाला आणि १९८९ मध्ये भारतभर आघाड्यांच्या राजकारणाचे युग सुरू झाले. ते २०१४ पर्यंत कायम होते. या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, सोनिया गांधी, पी. व्ही. नरसिंह राव असे अनेक दिग्गज नेते होते. देशाच्या अर्थकारणाला संपूर्ण कलाटणी देणारे डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ कॉंग्रेसकडे होते. मात्र यापैकी एकाही नेत्याला स्वबळावर आपल्या पक्षाला सत्तेत आणण्याची किमया साधता आली नाही. त्यामुळे हे युग आघाड्यांच्या राजकारणाचे युग होते. त्यातही या २५ वर्षांच्या कालखंडात देशाची सूत्रे १५ वर्षे कॉंग्रेसकडेच होती. २०१४ नंतर मात्र राजकारणाचा बाज बदलला. नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर भाजपची एकहाती सत्ता आली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा मोदी आणि भाजपचे स्वबळावर सरकार आले. मात्र आताच्या घडामोडी पुन्हा आघाड्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. १. १९८९ ते २०१४ या कालखंडात सरकार बनवण्यासाठीचा फॉर्म्युला ठरला होता. जास्तीत जास्त जनाधार असणाऱ्या राजकीय पक्षांना आपल्या आघाडीत सहभागी करून घेणे त्यावेळी या राजकारणात कॉंग्रेसचा दबदबा होता. त्यामुळे २५ पैकी १५ वर्षे कॉंग्रेसच सत्तेच्या केंद्रस्थानी होती. २. २०१४ मध्ये भाजपने आघाडीच्या राजकारणाचे मिथक तोडले. हे युग आता संपुष्टात आणल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. २०१९ मध्येही भाजपची कामगिरी कायम राहीली. ३. २०२३ मध्ये आघाड्यांच्या राजकारणाला नितीश कुमार यांनी पुन्हा फुंकर घातली. कॉंग्रेससह २८ पक्षांना त्यांनी पुन्हा एका मंचावर आणले. २०१९ च्या निकालाचा अभ्यास केला तर एका मंचावर आलेल्या पक्षांच्या मतांची बेरीज ६० टक्के होत होती. ४. आघाड्यांच्या राजकारणाची कुणकुण लागताच भाजपही सक्रिय झाली. त्यांनीही मित्रपक्ष गोळा करण्यास सुरूवात केली आणि ४० लहान सहान पक्षांना आपल्याशी जोडून घेतले. एवढेच करून ते थांबले नाहीत तर विरोधी आघाडीतील संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय लोकदल यांनाही आपल्याकडे खेचून आणले. ५. दोन्ही बाजूंच्या आघाड्या तयार झाल्या आहेत. मात्र या आघाड्यांमधील प्रमुख पक्ष असलेले भाजप आणि कॉंग्रेस याची कामगिरी सरस होण्याची गरज आहे. त्यांची कामगिरी थोडीजरी ढेपाळली तर अन्य घटक पक्ष वरचढ ठरू लागतील आणि किंगमेकरच्या भूमिकेत जाउन बसतील. ते भविष्याच्या दृष्टीने कदाचित तारकही असेल किंवा मारकही.