कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचा निधी बुलेट ट्रेनकडे वळवला : आ. चव्हाण
कराड – मी केंद्रात मंत्री असताना माझा आवडता ड्रीम प्रोजेक्ट म्हणून कराड-चिपळूण रेल्वेमार्गास मंजूरी आणली. त्या कामाचे तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला येवून भूमिपूजनही केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे पैसे बुलेट ट्रेनकडे वळवून या कामाला खीळ आणली. परंतु हा रेल्वेमार्ग मी करणारच, अशी ग्वाही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
काले (ता. कराड) येथील जाहीर सभेत ते बोलत होते. रामहरी रुपनवर, डॉ. इंद्रजित मोहिते, ऍड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील-उंडाळकर, मनोहर शिंदे, अजितराव पाटील-चिखलीकर, जयवंतराव जगताप, पोलीस पाटील शामराव पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असल्यापासून आजपर्यंत कराड दक्षिणमध्ये केलेल्या कामाबाबत काहीही शंका असल्यास त्या कामांचे जीआर माझ्याकडे आहेत. कराड-चिपळूण रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजन सुरेश प्रभु यांनी मला घेवून केले. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कराड-चिपळूण रेल्वे मार्ग अडवला आहे. काहीही झाले तरी तो मार्ग मी करणारच.
मी केंद्रात मंत्री कराडमधील यशवंतराव चव्हाण समाधी स्थळाजवळ संरक्षक भिंत बांधली. त्यानंतर कराड नगरपालिकेकडून 39 कोटी रुपयांचा निधीही आणला. परंतु स्वनिधी वेळेत न भरल्याने तो निधी परत गेला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विकासकामांबाबत बेताल वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या चष्म्याचा नंबर वाढला असावा हेही मी समजू शकतो. परंतु काही मंडळी झोपेचे सोंग घेवून कराडला विकासनिधी कोणी आणला. हे सोयीस्करपणे विसरत आहेत. विरोधकांना कराडची जनता कधीच साथ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.





