Kapurhol Accident: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात! दारूच्या नशेत भरधाव जीपने उडवलं; वृद्धाचा मृत्यू
Kapurhol Accident: श्री सिद्धनाथ म्हसोबाच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला; हरिचंद्र गावच्या हद्दीत मद्यधुंद जीप चालकाने मारली पाठीमागून धडक.

Kapurhol Accident – पुणे-सातारा महामार्गावरील हरिचंद्र गावच्या हद्दीत सर्व्हिस रोडवर दारूच्या नशेत भरधाव व निष्काळजीपणे जीप चालवून मारुती वॅगनआर कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. ही भीषण दुर्घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ज्ञानदेव गणपती दळवी (वय ६५, रा. सांगली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी जीप चालक प्रसाद हनुमंत जाधव (वय ३०, रा. वरगळ, ता. जि. सातारा) याच्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश पांडुरंग पाटील (वय ३५, रा. खिरवडे, ता. शिराळा, जि. सांगली) हे आपल्या कुटुंबीयांसह वॅगनआर कारमधून श्री सिद्धनाथ म्हसोबाच्या देवदर्शनासाठी जात होते.
हरिचंद्र गावाच्या हद्दीतील पुलाजवळील सर्व्हिस रोडवर आले असता, मागून येणाऱ्या जीप चालकाने मद्यप्राशन करून वाहनावरील ताबा गमावला व कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ज्ञानदेव दळवी यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तर निलेश पाटील, प्रिया अमोल दळवी (वय १०), दृष्टी अमोल दळवी (वय ७) आणि शारदा ज्ञानदेव दळवी (वय ५५) हे चौघे जखमी झाले असून त्यांच्या हाता-पायांना फ्रॅक्चर झाले आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.




