Kapardikeshwar Temple : कपर्दिकेश्वर मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष! भस्म लेपन आणि ९०० वर्षांचा वारसा; काय आहे मंदिराचे वैशिष्ट्य?
Kapardikeshwar Temple : जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक ओतूरमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह; पहाटे गीता डुंबरे आणि रासकर परिवाराच्या हस्ते महाआरती संपन्न.

Kapardikeshwar Temple – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील ऐतिहासिक कपर्दिकेश्वर मंदिरात रविवार, दि. १५ रोजी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे ६ वाजता गीता डुंबरे तसेच श्री व सौ आनंद रासकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश सुरू करण्यात आला. यावेळी कपर्दिकेश्वर देवधर्म ट्रस्टचे अध्यक्ष अनिल तांबे, सचिव महेंद्र पानसरे, सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
मांडवी नदीकाठी वसलेल्या या ९०० वर्षे जुन्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासून महाभिषेक, विशेष पूजा आणि शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. या दिवशी महादेव मूर्तीला भस्म लेपन आणि शिवलिंगावर तांदळाच्या पिंडीची आकर्षक सजावट केली जाते. ओतूरचे कपर्दिकेश्वर मंदिर हे स्वयंभू मानले जाते आणि या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. महाशिवरात्री उत्सव या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि रोषणाई करण्यात आली होती. पहाटे मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते महाभिषेक संपन्न होतो.
महाशिवरात्रीला ओतूर परिसरातून तसेच जुन्नर तालुक्यातून हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या पवित्र वातावरणात ‘हर हर महादेव’ च्या घोषात शिवभक्तांनी दिवसभर दर्शन घेतले. कपर्दिकेश्वर मंदिराजवळच संत तुकाराम महाराजांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवनी समाधी असून, अनेक भाविकांनी तिथेही दर्शन घेतले.
कपर्दिकेश्वर स्विमिंग-वॉकिंग ग्रुप, देवधर्म संस्थेचे सर्व सभासद त्याचबरोबर मोदकेश्वर गणेश मंडळ (बाजारपेठ) यांच्याकडून दोन टन खिचडी प्रसाद दिवसभर शिवभक्तांसाठी वाटप करण्यात आले. तसेच शिवभक्त माणिक डुंबरे यांच्याकडून राजगिरा चिक्की, रामदास धोंडीबा ढमाले यांच्याकडून केळीचे व अनिल वर्पे यांच्याकडून बिसलरी पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ह.भ.प. गणपत महाराज ढमाले यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवसभरात सुमारे एक लाखाहून अधिक शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.





