Sant Tukaram Maharaj Jayanti : संत तुकाराम महाराजांचा ४१८ वा जन्मोत्सव सोहळा संपन्न; पाहा काय होतं विशेष आकर्षण?
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा ४१८ वा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

Sant Tukaram Maharaj Jayanti – जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा ४१८ वा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कर्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वैकुंठगमन (गोपाळपुरा) परिसरात माघ शुद्ध वसंत पंचमीच्या दिवशी कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली.
जन्मोत्सवानिमित्त चैतन्य प्राणायाम, ब्रह्मनाद योग साधना, हरिपाठ, गाथा पारायण, भजन, कीर्तन, जागर अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थानच्या वतीने मुख्य मंदिर व जन्मस्थान मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. सप्ताहादरम्यान नित्यनेमाने पहाटे काकड आरती, महापूजा, गाथा पारायण, भजन, चरित्र वाचन, हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.
माघ शुद्ध वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या आधारे जन्म किर्तन सादर केले. यावेळी श्रींचा पाळणा हलविण्यात आला व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या सप्ताहात भजनी मंडळांच्या भजन स्पर्धा, अभंग-गवळण, भक्तीगीत गायन स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला व अभंग निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांचे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी बैलगाडा संघटना, जन्मोत्सव सोहळा समिती व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने बैलगाडा शर्यतीचेही आयोजन करण्यात आले. यंदा जन्मस्थान मंदिराची देखभाल व्यवस्था श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज मोरे यांच्याकडे असून, जन्मस्थान मंदिरात सरस्वती महिला भजनी मंडळाचे संगीत भजन व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.





