Kantara : ‘कांतारा’च्या कलाकारांचा भीषण अपघात; स्टारकास्टने भरलेली बस उलटली

Kantara | Rishab Shetty : अभिनेता-दिग्दर्शक रिषभ शेट्टीचा कांतारा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने अनेक मोठे रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. लोक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत होते. यादरम्यान काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
अभिनेता-दिग्दर्शक रिषभ शेट्टीने कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. रिषभ शेट्टीने कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली होती. रिषभ शेट्टीने सोशल मीडियावर रिलीज डेटची घोषणा केली आहे. ’कांतारा : चॅप्टर 1′ 2 ऑक्टोबर 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
सध्या या सिनेमाचा शूटिंग सुरु असून, चित्रपटाच्या सेटवरुन एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. शूटींगच्या सेटवरुन परतणाऱ्या कलाकारांच्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक ज्युनियर कलाकारांना दुखापत झाली आहे. तसेच एक ज्युनिअर कलाकार गंभीर जखमी असल्याचंही सांगितलं जातंय.
सध्या या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक तपासणी केली जातेय. यामध्ये अनेक कलाकारांना दुखापत झाल्याचंही सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री चित्रपटाच्या टीमला घेऊन जाणारी मिनी बस उलटली. “जडकलमधील मुदूर येथे शूटिंग पूर्ण करून ते कोल्लूरला परतत असताना ही घटना घडली,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
मिनी बसमध्ये 20 कनिष्ठ कलाकार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर जखमींना जडकल आणि कुंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, ‘कांतारा’ चित्रपटामध्ये कर्नाटकातील प्रसिद्ध ‘भूत कोला’ उत्सवाची कथा दाखवण्यात आली होती, तर आता ‘कांतारा : अध्याय 1’ मध्ये कदंब कालावधीचा शोध घेतला जाईल. कदंब काळ हा भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या आकर्षक समृद्धी आणि ऐतिहासिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये कदंब काळातील कथा पाहायला मिळणार आहे.





