कांशीराम यांना भारतरत्न देण्यात यावा; ‘या’ भाजप खासदाराने केली मागणी

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या शाहाजहानपूर येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार अरूण कुमार सागर यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च किताब देण्यात यावा अशी मागणी केली आहे. कांशीराम हे दलित राजकारणाचा चेहरा असून बहुजनांचे नायक आहेत. त्यांनी मागास वर्गाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले असे सागर यांनी म्हटले आहे.
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी अरूण कुमार सागर यांच्या या मागणीचे समर्थन केले आहे. जर कांशीराम यांना भारतरत्न दिले गेले तर बहुजन समाज पक्ष या निर्णयाचे स्वागत करेल असे मायावती यांनी म्हटले आहे. मात्र त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने दलितांची दिशाभूल करण्याचे काम बंद करावे असेही त्यांनी म्हटले आहे. अरूण कुमार सागर हे स्वत: दलित समुदायातील आहेत. आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात त्यांनी बहुजन समाज पक्षातूनच केली होती. ते पक्षाचे विभागीय समन्वयकही होते.
मायावती यांच्या २००७ ते २०१२ सरकारच्या काळात ते उत्तर प्रदेशचे मंत्रीही होते. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर २०१५ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आता ते उत्तर प्रदेशात भाजपचे एकमेव जाटव दलित खासदार आहेत. कांशीराम यांनी समाजात परिवर्तन आणले. त्यांनी दलित, वंचितांसाठी बलिदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित, मागासवर्गीय आणि शोषित वर्गाच्या उन्नतीबाबत बोलत असतात. त्यामुळे ते कांशीराम यांना भारतरत्न देतील आणि त्यांचा सन्मान करतील अशी आपल्याला अपेक्षा असल्याचे सागर एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.





