Kanhe Takwe Road: ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?’ कान्हे-टाकवे मार्गावर प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
Kanhe Takwe Road: औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि विद्यार्थ्यांची रोजची कसरत; प्रशासनाच्या निकृष्ट दर्जाच्या डागडुजीमुळे नागरिकांमधून प्रचंड संताप.

Kanhe Takwe Road – अंदर मावळला जोडणाऱ्या कान्हे-टाकवे रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कान्हे, टाकवे तसेच अंदर मावळातील अनेक गावांना जोडणारा हा प्रमुख मार्ग असून, दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात. औद्योगिक क्षेत्रातील कामगार, विद्यार्थी, शेतकरी तसेच अवजड वाहनांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने अचानक वाहनाचा तोल जाऊन किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत.
सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवितहानी झाली नसली, तरी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्यावरील खड्डे अधिकच वाढत आहेत. मोठ्या वाहनांना वाट देताना दुचाकीस्वारांना खड्ड्यातून वाहन चालवावे लागत असून, त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. अनेक वाहनांचे नुकसान होत असून, नागरिकांना आर्थिक फटकाही बसत आहे.
“कान्हे-टाकवे रस्ता हा अंदर मावळला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. मात्र सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडून करण्यात येणारी तात्पुरती डागडुजी काही दिवसांतच उखडते. त्यामुळे कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करणे गरजेचे आहे.”
– सुजित सातकर, नागरिक





