Nane Maval : नाणे मावळात वारंवार बत्ती गुल; खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त
Nane Maval: अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत

कान्हे – तालुक्यातील कान्हे, नाणे मावळ, नायगाव, चिखलसे, कामशेत तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर झाडे पडणे, तारा तुटणे यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे महावितरणकडून सांगितले जात असले, तरी वीज गेल्यानंतर ती पूर्ववत होण्यासाठी अनेक तास, तर काही ठिकाणी एक ते दोन दिवस लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसाळ्यात वीजपुरवठा काही काळ खंडित होणे स्वाभाविक असले तरी गेल्या काही दिवसांपासून वारंवार सुरू असलेल्या वीजखंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक गावांमध्ये दिवसातून अनेक वेळा वीज जाते, तर काही भागात दीर्घकाळ वीजपुरवठा बंद राहत असल्याने दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे.
नाणे मावळ परिसरातील अनेक गावांमध्ये शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर विजेवर अवलंबून आहेत. पाणी उपसा, मोटारी चालविणे, दुग्ध व्यवसायाशी संबंधित कामे आणि इतर शेतीची कामे वीज नसल्यामुळे ठप्प होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाळ्याच्या हंगामात शेतीची महत्त्वाची कामे सुरू असताना वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
व्यापारी वर्गालाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. वीज नसल्यामुळे दुकाने, लहान उद्योग, थंडगार पेये आणि दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी डिजिटल व्यवहारही ठप्प होत असल्याने ग्राहक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच घरगुती ग्राहकांनाही सततच्या अंधाराचा सामना करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असून, ऑनलाइन काम करणारे नोकरदार आणि व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद झाल्यास ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचीही मोठी गैरसोय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अधिकाऱ्यांचे फोन बंद; नागरिकांचा आरोप
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी नागरिकांनी कामशेत येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिकाऱ्यांचे दूरध्वनी अनेकदा बंद लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही नागरिकांनी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊनही संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याची तक्रार केली.
त्यामुळे वीज गेल्यानंतर तक्रार करायची तरी कोणाकडे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांनी महावितरणकडे परिसरातील वीजवाहिन्यांची तातडीने पाहणी करून दोष दूर करण्याची, जुन्या व धोकादायक तारा बदलण्याची, वादळात वारंवार बिघाड होणाऱ्या ठिकाणांची दुरुस्ती करण्याची आणि तक्रारींसाठी २४ तास कार्यरत संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
‘वादळी वारा आणि पावसामुळे वीजपुरवठा खंडित होणे समजू शकते, मात्र वीज गेल्यानंतर ती पूर्ववत होण्यासाठी अनेक तास लागतात. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असतो. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करायची तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणने तातडीने याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा.’ – लहु चोपडे, नागरिक
‘वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांच्या तारा तुटल्या आहेत. त्या दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व बिघाड दूर होताच संबंधित भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.’ – राहुल परदेशी, उपअभियंता, महावितरण
Nana Kate : धरण भरले, पाणी कपात रद्द करा; माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांची आयुक्तांकडे मागणी





