कन्हैया कुमारने घेतली राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता आणि जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. अलीकडील काळात अनेक युवा नेत्यांनी रामराम केलेल्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधण्यात येत आहे.
गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी हेही कॉंग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने मेवाणी यांच्या विरोधात उमेदवार न देता त्यांना मदत केली होती. कुमार यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमार यांची कम्युनिस्ट पक्षात घुसमट होत आहे. कुमार यांनी राहुल गांधी यांची मंगळवारी भेट घेतली. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा झाली.
भाकपचे सरचिटणीस डी राजा यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, या अंदाजाबद्दल मी ऐकले आहे. मी एवढेच सांगू शकेन की या महिन्यात पक्षाच्या झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ते सहभागी झाले होते. त्यात त्यांनी सहभाग घेतला आणि भाषणही केले. कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या राजकारणात त्याला महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते. गेले तीन दशक बिहारमध्ये कॉंग्रेस नेतृत्वाची पोकळी आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या पक्षाची कामगिरी खराब झाली होती.





