Kangana Ranaut : कंगना राणावतला मोठा धक्का ! मानहानीची तक्रार रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

चंडीगड : हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार कंगना राणावत यांना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. कंगनाने महिंदर कौर या शेतकरी महिलेने पैशासाठी शेतकरी आंदोलनात निषेध केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात पीडित महिंदर कौरने कंगनाविरुद्ध मानहानीची तक्रार २०२१ मध्ये दाखल केली होती.
कंगनाने ही तक्रार रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अपील केले होते. परंतु आता न्यायालयाने ही तक्रार रद्द करण्यास नकार दिला आहे. याचिका फेटाळल्यानंतर २०२१ पासून थांबलेला कंगनाविरुद्धचा खटला पुन्हा सुरू होईल. हे प्रकरण २०२१ सालाशी संबंधित आहे. देशात शेतकरी आंदोलन जोरात सुरू होते. त्या काळात कंगनाने समाज माध्यमांत एक पोस्ट पोस्ट केली होती.
या पोस्टमध्ये तिने भटिंडाच्या बहादुरगड जंडिया गावातील महिला शेतकरी महिंदर कौरवर प्रत्येकी १०० रुपये घेऊन निषेधात सामील झाल्याचा आरोप केला होता. कंगनाच्या याच पोस्टविरुद्ध, त्या महिंदर कौरने ४ जानेवारी २०२१ रोजी भटिंडा न्यायालयात धाव घेतली होती. मग कंगनाने नंतर ती पोस्ट काढून टाकली. तथापि, कंगनाने यावर म्हटले होते की तिने वकिलाची पोस्ट पुन्हा पोस्ट केली होती.





