Pune District : कळंब गण, गट आरक्षणावर आक्षेप घेणार; महिला आरक्षणामुळे इच्छुकांचे राजकीय गणित बिघडले

मंचर : आंबेगाव तालुक्यात मागील पंचवार्षिक निवडणुकीला ओबीसी महिला आरक्षण कळंब-महाळुंगे पंचायत समिती गणात होते. तसेच कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण होते. तेच आरक्षण पुन्हा यावेळी पडल्याने इच्छुक उमेदवारांचे राजकीय गणित बिघडले आहे. काही इच्छुक उमेदवार या संदर्भात आरक्षण सोडती बाबत आक्षेप घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले.
आंबेगाव तालुका पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत जाहीर झाली. कळंब-महाळुंगे पंचायत समितीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण सोडत निघाली. चांडोली पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण तसेच कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण घोषित झाले आहे.
या आरक्षण सोडतीमुळे इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. सर्वसाधारण पुरुष गटातील इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राध्यापक दत्तात्रय भालेराव, डॉ. सुहास कहडणे, विनोद मोढवे, अजय आवटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस मयूर भालेराव, शिवसेना उबाठा गटाचे तालुका अध्यक्ष नितीन भालेराव, शिंदे शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रवीण थोरात, माजी उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, उपसरपंच शेखर चिखले यांचा आरक्षण सोडतीमुळे पत्ता कट झाला आहे. कळंब जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला आल्यामुळे हे इच्छुक आपल्या पत्नीला निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. अशी चर्चा नागरिकांमध्ये होवू लागली आहे.
कळंब-महाळुंगे पंचायत समिती गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे माजी सभापती उषा रमेश कानडे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे कळंब-महाळुंगे पंचायत समिती गणातून ओबीसी महिला उमेदवारी आपल्या घरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेऊ शकतात. अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे.
या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र असलेले उमेदवार सुद्धा आपल्या पत्नींना निवडणूक रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. माजी सरपंच राजश्री नितीन भालेराव कळंब-महाळुंगे पंचायत समिती लढवू शकतात. चांडोली पंचायत समिती सर्वसाधारण महिला गणातून माजी सरपंच प्रीती प्रवीण थोरात निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. आरक्षण सोडतीमुळे पुरुष उमेदवारांचे धाबे दणाणले असून त्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. इच्छुक उमेदवार आपल्या पत्नींना तिकीट मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्याची शक्यता आहे. पक्ष जुन्या उमेदवारांना संधी देणार का नवीन उमेदवार चेहरा समोर आणणार. या बाबत जोरदार चर्चा सुरु आहे.





