Kalakar Katta – गुडलक चौकातून भांडारकर रस्त्यावर बस वळवण्यासाठी अडचण होत असल्याने रस्ता रुंदीकरणासाठी तेथील काॅर्नरची जागा रहिवाशांकडून हस्तांतरीत करून घेतली. प्रत्यक्षात रस्तारुंदीकरण न होता तेथे कलाकार कट्टा साकारण्यात आला. त्या कट्ट्याच्या गैरवापरामुळे त्रास होत असल्याची तक्रार डेक्कन जिमखाना येथील रहिवाशांनी केली आहे. हा कलाकार कट्टा शांततेच्या ठिकाणी हलवावा आणि जागा रस्ता रुंदीकरणासाठी घेतल्याने तेथे रुंदीकरण करावे, अशी मागणी रहिवाशांनी नगरसेवक, पालिका आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. हा कलाकार कट्टा हक्काचा असून तो हलवू नये अशी मागणी एकाबाजूने होत असताना तेथील रहिवाशांनी वस्तुस्थितीदर्शक अनेक गोष्टींच्या तक्रारी आयुक्त, नगरसेवकांकडे केल्या आहेत. यावेळी सुनील पांडे, ॲड. मिताली सावळेकर, पुनीत जोशी आणि मंजुश्री खर्डेकर, डेक्कन जिमखाना रहिवासी संघाचे सचिव किशोर गोडबोले उपस्थित होते. कलाकार कट्ट्यावर कला सादर करण्यासाठी येणाऱ्यांना तेथे उभे राहण्यासाठी जागा आहे का, मुळात हा काॅर्नर कला सादरीकरणास योग्य आहे का? येथे कला सादर करण्यापेक्षा मोठ्या आवाजात लाउडस्पीकर लावून आंदोलने केली जातात, ज्यामुळे आम्हां रहिवाशांना त्रास होतो. घर सोडून दुसरीकडे जाण्याची वेळ आल्याचे काहीजणांनी सांगितले. कलाकार कट्ट्याच्या नावावर अनेक तरुण- तरुणी घरांसमोर पार्किंग करतात. नो पार्किंगमध्येही गाड्या पार्क करतात. आम्हालाच आमच्या गाड्या काढताही येत नाहीत आणि बाहेरून आत आणताही येत नाहीत अशी स्थिती आहे. अशावेळी दुर्घटना घडली तर अग्निशमन दलाची गाडीही येऊ शकणार नाही अशी परिस्थिती असल्याचेही ते म्हणाले. कलाकार कट्ट्याला विरोध नाही. त्याची ही जागा नाही. तो एखाद्या शांत, निवांत, प्रशस्त जागी, उद्यानांमध्ये असणे अपेक्षित आहे. मुळात पुणे हे कलाकारांची मांदियाळी असलेले शहर आहे. कोपऱ्यामध्ये, अडचणीच्या ठिकाणी, वाहतुकीचा खोळंबा करून कट्टा चालू ठेवणे अयोग्य असल्याचे मतही त्यांनी मांडले. येथे चित्रकार वगैरे येतात. ते एखाद्याचे चित्र काढून त्याची विक्री करतात. त्यामुळे येथे कलेचे व्यावसायिकरण झाले आहे. येथे रात्री अनेकजण मद्य प्यायला बसतात. रस्त्यावर वस्तू विकणारे त्याचा गोदाम म्हणून उपयोग करतात. त्यामुळे त्याचा उद्देश्यही हरवला आहे, असेही काहीजणांनी नमूद केले.