Kagal Assembly Election 2024 Results : कागलमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) हसन मुश्रीफ विजयी, समरजितसिंह घाटगेंना पराभवाचा धक्का

Kagal Assembly Election 2024 Results : महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आज(23 नोव्हेंबर) जाहीर होत असून मतमोजणीस सुरूवात झाली आहे. एकेका मतदारसंघाचा निकाल समोर येण्यासही सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक बिग फाईट्स पहायला मिळाल्या, त्यापैकी एक म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ.
कागल विधानसभेसाठी महायुतीकडून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) हसन मुश्रीफ तर महाविकास आघाडीकडून
समरजितसिंह घाटगे हे रिंगणात होते. मागच्या 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालात कागलची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांनी जिंकली होती. यंदाही म्हणजेच 2024 च्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली आहे. हसन मुश्रीफ यांनी घाटगे समरजीतसिंह विक्रमसिंह यांचा पराभव केला आहे.
कागल विधानसभा मतदारसंघातून (Kagal Election Result) अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) अकरा हजार सहाशे नऊ मतांनी विजयी झाले आहेत. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने समरजितसिंह घाटगे यांनी बंडखोरी केली होती आणि त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत, तुतारी हाती घेतली होती. 1999 पासून मुश्रीफ हे सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. हसन मुश्रीफ यांची ही सातवी विधानसभा निवडणूक आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला महायुतीमध्ये 288 पैकी 54 जागा मिळाल्या होत्या. यापैकी 40 मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होता. कागल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरूद्ध अजित पवार गट यांच्या राष्ट्रवादीत दुहेरी सामना झाला. पण अखेर हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली.





