प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगावच्या स्थानिक राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली असून, लोकनियुक्त सरपंच सुवर्णा वायदंडे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे गावातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, स्वाती पाचुंदकर, माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, सागर देवकर, माजी उपसरपंच राहुल पवार, ग्रामपंचायत सदस्य हर्षल गदादे तसेच भाजपचे पदाधिकारी हर्षल जाधव, नानासाहेब लांडे, अनिल शेळके, विलास बत्ते यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मागील आठवड्यातच ग्रामपंचायत सदस्य हर्षल गदादे व माजी सदस्य आनंदा खेडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर आता थेट सरपंचांनीच सत्ताधारी गटात प्रवेश केल्याने रांजणगाव गणपती परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत निर्णायक ठरू शकतो, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे. या घडामोडीनंतर आता इतर पक्षांचे स्थानिक नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.