K. Kavitha : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीवर (बीआरएस) त्यांच्या कन्या के.कविता (K. Kavitha) यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले. तेलंगणातील कॉंग्रेस सरकारच्या त्रुटी दाखवण्यात प्रमुख विरोधी पक्ष बीआरएसला सपशेल अपयश आले. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेसला पालिका निवडणुकांत मोठे यश मिळाले, असा आरोप त्यांनी केला. बीआरएस पक्षात आणि केसीआर यांच्या कुटूंबातही कलह असल्याचे मागील काळात समोर आले. स्वत: कविता (K. Kavitha) यांनी पक्षातील काही नेत्यांवर, नातलगांवर आरोप केले. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर कविता यांनी स्वतंत्र पक्ष स्थापण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कॉंग्रेस आणि बीआरएस या तेलंगणातील दोन्ही प्रमुख पक्षांवर त्या सातत्याने निशाणा साधत आहेत. पालिका निवडणुकांच्या निकालांवरून त्यांनी टीकेचे ते सत्र कायम ठेवले. कॉंग्रेस सरकारने आधी दिलेली कुठली आश्वासने पूर्ण केली नाहीत. मात्र, शहरांच्या विकासाबाबत बीआरएसने सत्ताधारी कॉंग्रेसला पालिका निवडणुकांत साधे प्रश्नही विचारले नाहीत. विश्वासार्ह पर्याय नसल्याने जनतेने कॉंग्रेसला मतं दिली, असा दावा त्यांनी केला.