Jyoti Chandekar: “प्रेक्षकांचं प्रेम आईने कमावलं…”, ज्योती चांदेकर यांच्या मुलीची भावनिक पोस्ट

Jyoti Chandekar: ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी पुण्यात वृद्धापकाळातील आजारामुळे निधन झालं. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि मालिका जगताला मोठा धक्का बसला आहे.
५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ज्योती चांदेकर यांनी मराठी मालिका, नाटक आणि सिनेमामधून अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या. गेल्या अडीच वर्षांपासून त्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत ‘पूर्णा आजी’ची भूमिका करत होत्या. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर “पूर्णा आजीची भूमिका कधीच रिप्लेस करू नका” अशा प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोर्णिमा पंडितने व्यक्त केल्या भावना…
मी, प्रेक्षक आणि ज्योती चांदेकर-पंडित (आई )
मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्र-मैत्रिणींच्या आयांपेक्षा वेगळी आहे हे हळूहळू कळू लागलं होतं. आई मला आणि तेजूला कधीच पुरायची नाही. तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे. विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं की, माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात.
वर्दीवाले आणि नाटक-सिनेमांमध्ये काम करणारे घरी कधी येतील याचा पत्ताच नसतो असं माझी आज्जी म्हणायची.
तेव्हा आपली आई या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं. माझ्याही पेक्षा प्रेक्षकांचं आईवर जास्त प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही. पण आई आता गेली, अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगद पुसून गेला. पूर्वी नाटक, नंतर सिनेमा आणि आता वयाच्या या टप्प्यात मालिकांमधला प्रेक्षक आणि प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्षे वाढतच गेला. माझ्या आणि तेजूच्या जवळच्या माणसांनी, कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच पण तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण…
अजूनही सोशल मीडियावर पूर्णा आजीला रिप्लेस करू नका. तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पूर्णा आजी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली. असा कलाकार होणे नाही. अशा अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं, किती प्रेक्षक जोडले आहेत याची प्रचिती आली. आता पटतंय, कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो, मग घरच्यांचा असतो.
माझी आई म्हणजे ज्योती चांदेकर- पंडित
एक रंगकर्मी, कलाकार.अनेक संकटांमधून वाट काढत ती तिचं आयुष्य थाटात जगली, रूबाबात राहिली, माणसं जोडली, नाती बनवली, प्रेम वाटलं आणि प्रेम मिळवलं.
या दुःखात आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबियांचे, मित्र परिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार.
पोर्णिमा पंडित
दरम्यान, ज्योती चांदेकर आणि त्यांची कन्या तेजस्विनी पंडित यांनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र, दुसरी कन्या पोर्णिमा पंडित-पुलन ही कलाविश्वापासून दूर राहिली.
ज्योती चांदेकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेले चित्रपट साकारले. ‘मी सिंधुताई सपकाळ’ सोबतच ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.
चित्रपटांसह त्यांनी छोट्या पडद्यावरही आपली छाप पाडली. गेल्या काही वर्षांत ‘ठरलं तर मग’, ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमधून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती.





