Juvenile Escape: तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांचे पलायन! बारामती बालगृहात दाखल होण्यास दिला होता नकार
Juvenile Escape: कोरेगाव पार्क येथील 'साथी' खुले निवारा गृहातून ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांचे पलायन; दोघांना चिंचवड व परिसरातून पुन्हा घेतले ताब्यात.

Juvenile Escape – कोरेगाव पार्कमधील साथी खुले निवारा गृह येथून तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी कर्मचाऱ्यांशी झटापट करून पलायन केले. यापैकी दोघांना पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले असून, तिसऱ्या १७ वर्षीय बालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बालकल्याण समिती क्रमांक दोनने तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ८ जुलै रोजी साथी खुले निवारा गृहात दाखल केले होते.
मात्र, ही मुले संस्थेतील इतर मुलांना घाबरवणे, पूर्वी केलेल्या गुन्ह्यांची माहिती देऊन भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे आढळले. यामुळे संस्थेने त्यांच्या बदलीसाठी बालकल्याण समितीकडे प्रस्ताव पाठविला होता. समितीने तिन्ही बालकांना बारामतीतील शासकीय निरीक्षकगृहात पाठविण्याचे आदेश दिले. १४ जुलै रोजी कर्मचाऱ्यांनी त्यांना बारामती येथे नेले. मात्र, संबंधित बालकांनी तेथे राहण्यास नकार दिल्याने त्यांना पुन्हा पुण्यातील संस्थेत आणण्यात आले.
रात्री साडेदहाच्या सुमारास संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनातून उतरताना तिन्ही बालकांनी कर्मचाऱ्यांशी झटापट करून पळ काढला. या झटापटीत एका कर्मचाऱ्याच्या दुखापत झाली. त्यानंतर पोलिसांना आणि बालकल्याण समितीला माहिती देण्यात आली. पळून गेलेल्या तिघांपैकी एकाला तत्काळ ताब्यात घेण्यात आले, तर दुसऱ्याला चिंचवड परिसरातून कोरेगाव पार्क पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. तिसरा मुलगा हा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. चिखली परिसरातील त्याच्या राहत्या घरासह विविध ठिकाणी शोध सुरू आहे. कोरेगाव पार्क पोलीस पुढील तपास करत आहेत.

