Junnar ZP School: जुन्नरमध्ये पोषण आहाराची ‘धान्यकोंडी’! शाळा सुरू, पण ताटात काय वाढायचं? धक्कादायक वास्तव
Junnar ZP School: जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तांदूळ आणि डाळींचा तीव्र तुटवडा; मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शिक्षकांची कसरत.

Junnar ZP School – शाळेची घंटा वाजते… वर्ग भरतो… शिक्षक शिकवतात; मात्र मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या ताटात गरमागरम पोषण आहार वाढण्याची वेळ आली की, काही शाळांमध्ये एकच प्रश्न उभा राहतोय-‘धान्य कुठून आणायचे?’ जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेच्या धान्यपुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या ताटातील पोषण आहाराचीच कोंडी झाल्याचे चित्र आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले असतानाही काही शाळांमध्ये तांदूळ, डाळी आणि अन्य आवश्यक साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. मागील शैक्षणिक वर्षातील शिल्लक तांदळाचा साठा जूनमध्ये शाळांना उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, तो साठाही आता कमी झाल्याने नवीन पुरवठा वेळेत होणे आवश्यक होते.
काही ठिकाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने शिक्षकांना स्थानिक पातळीवरून धान्याची तात्पुरती व्यवस्था करावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही शाळांमध्ये तेल उपलब्ध आहे; मात्र तांदूळ नाही. कुठे हळद-मीठ आहे; मात्र तूरडाळ, मूगडाळ किंवा वाटाणा संपलेला आहे. उपलब्ध साहित्याच्या आधारे विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे.
त्यामुळे नियोजित आहार देताना शाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.शिक्षकांचे मुख्य काम विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आहे. मात्र, धान्याचा तुटवडा निर्माण झाल्यास अध्यापनासोबत पोषण आहारासाठी साहित्याची जुळवाजुळव करण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येते. स्थानिक पातळीवर धान्य मिळविण्यासाठी धावपळ, उपलब्ध साठ्याचे नियोजन आणि विद्यार्थ्यांना वेळेत आहार देण्याची कसरत यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.
एका हातात खडू आणि दुसर्या हातात धान्याची चिंता, अशी परिस्थिती काही शाळांमध्ये निर्माण झाल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. पोषण आहाराच्या धान्यपुरवठ्याबाबत आणखी एक गंभीर तक्रार समोर येत आहे. शाळांना पुरवठा करण्यात येणार्या धान्याचे वजन कागदावर नमूद केलेल्या वजनापेक्षा प्रत्यक्षात कमी भरत असल्याचे काही ठिकाणी सांगण्यात येत आहे.
अतिरिक्त कार्यभारामुळे नियोजनावर प्रश्न
जुन्नर तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र अधीक्षकपद आहे. मात्र, हे पद रिक्त असून सध्या त्याचा अतिरिक्त कार्यभार विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे यांच्याकडे आहे. पुरवठादारांची निवड, करार आणि निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव विद्यार्थ्यांच्या ताटापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
“पोषण आहाराच्या धान्याचा तुटवडा होता; मात्र आता पोषण आहाराचा पुरवठा उपलब्ध झाला असून संबंधित शाळांना धान्य देण्याचे काम सुरू आहे. तसेच, पोषण आहार पुरवठा करणार्या ठेकेदाराच्या वाहनामध्ये वजनकाटा ठेवण्याच्या सूचना देण्यात येतील.”
– अशोक लांडे, गटशिक्षणाधिकारी जुन्नर






