प्रभात वृत्तसेवा वाल्हे – वाल्हे (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भटक्या डोंबारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विशेष वर्ग सुरू करण्यात आला आहे. वाल्हे येथील माजी विद्यार्थ्यांच्या आदर्श सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून आणि ऑस्ट्रेलियातील अतिदक्षता विभागात कार्यरत असलेले डॉ. निलेश शहा यांच्या संकल्पनेतून हा वर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, गुरूवार (दि.१५) शाळेतील माजी विद्यार्थी, आदर्श सामाजिक फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. निलेश शहा यांनी या विशेष वर्गाला प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांची प्रगती, अडचणी याविषयी त्यांनी माहिती घेतली. त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत शिक्षण हेच जीवन बदलण्याचे प्रभावी साधन आहे, असे सांगितले.यावेळी मुख्याध्यापक भारत वाघोले, त्रिंबक भुजबळ, दत्तात्रय कुमठेकर, सहशिक्षिका जयश्री पवार, अनिता वाघोले, किर्ती लिपारे आदींसह ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. आर्थिक पाठबळातून उपक्रमात सातत्य उपक्रमाची संकल्पना डॉ. निलेश शहा यांनी मांडली असून आदर्श सामाजिक फाउंडेशनने ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या स्वतंत्र वर्गातून विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारणा, वाचन-लेखन कौशल्य, मूलभूत गणित तसेच संगणकाचे प्राथमिक ज्ञान दिले जाते. या विशेष वर्गासाठी स्वतंत्र शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली आहे. सामाजिक जबाबदारीची जाण ठेवत आदर्श फाउंडेशनने केवळ उपक्रम सुरू करून न थांबता तो सातत्याने चालू राहावा, यासाठी आर्थिक पाठबळ उभे केल्याचे आदर्श सामाजिक फाउंडेशनचे सचिव दादासाहेब राऊत यांनी सांगितले.