Junnar News : पिंपळगाव जोगा धरणाच्या विसर्गाने पुष्पावती नदीला पूर ; अनेक गावांचा संपर्क तुटला

प्रभात वृत्तसेवा
उदापूर – पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) धरणातून (दि. २८) रात्री तब्बल २७८० क्युसेक पाणी अचानक सोडल्याने पुष्पावती नदीला पूर आला आहे. या पुरामुळे परिसरातील लहान-मोठे पूल पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या पुराचा सर्वाधिक परिणाम पिंपळगाव जोगा येथील पुलावर झाला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने पिंपळगाव जोगा, सांगनोरे, कोल्हेवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. पाटबंधारे विभागाने अचानक पाणी सोडल्याने शेतीचे आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
परिसरातील अंदाजे ८० ते १०० मोटारी पाण्याखाली गेल्या आहेत. तसेच काही जनावरे दगावली आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरले आहे, तर एक पिकअप गाडी व परिसरातील एक मंदिरही पाण्यात गेले आहे. या अचानक झालेल्या नुकसानीमुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.पाणी शिरलेल्या प्रत्येक मोटरच्या दुरुस्तीसाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च येणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थ पंकज हांडे, शेखर हांडे, नवनाथ सुकाळे, निलेश हांडे, महेंद्र सस्ते आणि बळीराम हांडे यांनी सांगितले.





