Junnar News : दुष्काळात तेरावा! पिंपळगाव जोगा कालवा फुटला; हजारो लिटर पाणी वाया, पिकांसह जमिनीचे नुकसान
Junnar News : तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या! पिंपळगाव जोगा कालवा दुर्घटनेनंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी.

Junnar News – एकीकडे उन्हाळ्यामुळे अनेक भागांत तीव्र पाणी टंचाई जाणवत असताना, जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाचा डावा कालवा अचानक फुटल्याची घटना घडली आहे. या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने हजारो लिटर पाणी शेतात शिरले असून, यामुळे शेतकऱ्यांच्या तयार पिकांचे आणि तीस एकर शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले असून, त्या शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली आहे.
ऐन दुष्काळात कालवा फुटल्याने पाण्याचा अपव्यय झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कालव्याला भगदाड पडल्यानंतर पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, आसपासच्या शेतांमधील माती आणि पिके वाहून गेली आहेत. काही शेतकऱ्यांच्या विहिरींमध्येही कालव्याचे पाणी आणि चिखल शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना घडल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने संबंधित विभागाला कळवले, मात्र कालव्याची देखभाल दुरुस्ती योग्य वेळी न केल्यानेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कडक उन्हात पिकांना पाण्याची गरज असताना अशा प्रकारे कालवा फुटून पाणी वाया जाणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
प्रशासनाने या घटनेचा तातडीने पंचनामा करावा आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कालव्याची दुरुस्ती तातडीने न केल्यास पुढील काळात पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट
उन्हाळ्याच्या दिवसांत मोठ्या मेहनतीने उभी केलेली पिके कालव्याच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. केवळ पीकच नाही तर शेतातील सुपीक मातीही वाहून गेल्याने जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाला आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसल्याने बळीराजा पूर्णतः हवालदिल झाला असून, त्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.





