Junnar News: ‘चांदीची मोड द्या, दागिने घ्या…’ बहाणा करून महिलांनी मारला डल्ला? बेल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Junnar News: सीसीटीव्ही फुटेजमुळे महिलांच्या संशयास्पद हालचाली उघडकीस; पाठपुरावा करून सर्व दागिने हस्तगत करण्यात दुकानदाराला यश.

Junnar News – चांदीची मोड विकायची असून त्याच्या मोबदल्यात चांदीचे दागिने घ्यायचे आहेत, असा व्यवहार करण्याच्या बहाण्याने दोन महिला बेल्हे येथील न्यू सचिन ज्वेलर्समध्ये आल्या. दागिने पसंत केल्याचे दाखवत व्यवहार सुरू असतानाच त्यांनी दागिने घेऊन दुकानाबाहेर जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दुकानदाराच्या संशयामुळे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आणि महिलांच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या.
दुकानदाराने प्रसंगावधान राखत पाठपुरावा केल्याने दागिने परत मिळविण्यात यश आले. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिला चांदीची मोड घेऊन न्यू सचिन ज्वेलर्समध्ये आल्या होत्या. मोड देऊन त्याच्या मोबदल्यात चांदीचे दागिने खरेदी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे दुकानदाराने त्यांना विविध दागिने दाखविले.
दागिने पसंत केल्याचे दाखवत व्यवहार सुरू असताना महिलांनी दागिने घेऊन दुकानातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. दुकानदाराच्या लक्षात प्रकार येताच सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. त्यानंतर प्रसंगावधान राखून केलेल्या पाठपुराव्यामुळे दागिने परत मिळविण्यात आले. दरम्यान, संबंधित महिला अहिल्यानगर येथील असल्याचे सांगत होत्या.
तसेच कान्हूर पठार येथे बैलपोळ्यानिमित्त यात्रेसाठी आल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. त्या बेल्ह्यात नेमक्या कशा पोहोचल्या, याबाबतही परिसरात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र, त्यांचा बेल्ह्यात येण्यामागील नेमका उद्देश काय होता, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी अनोळखी ग्राहकांकडून आणल्या जाणार्या मोडीची योग्य पडताळणी करावी, व्यवहारादरम्यान सीसीटीव्ही चित्रीकरणावर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.





