Newasa News : अतिक्रमण आणि वीज चोरी खपवून घेणार नाही; नेवाशात पोलीस अधीक्षकांचा गणेश मंडळांना सज्जड इशारा!
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पावन भूमीतून यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि सामाजिक सलोख्याने साजरा व्हावा, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने (Newasa News) कंबर कसली आहे.

Newasa News : संत ज्ञानेश्वर माउलींच्या पावन भूमीतून यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि सामाजिक सलोख्याने साजरा व्हावा, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने (Newasa News) कंबर कसली आहे.
नेवासे येथील पावन गणपतीसमोरील लक्ष्मी मंगल कार्यालयात (Newasa News) आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गणेश मंडळांना स्पष्ट आणि सज्जड इशारा दिला. रस्त्यावर अतिक्रमण करणे आणि वीज चोरी करून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांवर थेट कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील, असा कडक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीला तहसीलदार डॉ. संजय बिरादार, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल बडवे, वैभव कानडे, नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे आणि विधिज्ञ संजय सुखधान आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी (Newasa News) पोलीस प्रशासनाने आधीच अनेक सराईत गुन्हेगारांवर (हिस्ट्रीशीटर) हद्दपारीची कारवाई पूर्ण केली आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास अथवा गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाल्यास अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सुदर्शन यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, केवळ कारवाईवर भर न देता उत्सवाला विधायक वळण देण्याचे आवाहनही त्यांनी केले. नेवाशाने ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवून प्रदूषणमुक्त उत्सवाचा आदर्श संपूर्ण जिल्ह्यासमोर ठेवावा, असे ते म्हणाले.
याशिवाय, यंदाच्या गणेशोत्सवात जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यसनमुक्ती जनजागृतीचा संकल्प हाती घेतला असून, गणेश मंडळांनी हा संदेश गावोगावी पोहोचवून पोलिसांच्या या सामाजिक मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीला विविध पक्षांचे नगरसेवक, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






