Onion Crop Loss – परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः काढणीस आलेला कांदा भिजल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे ओला झाला असून, त्याची गुणवत्ता घसरत चालली आहे. उन्हाळी हंगामासाठी मोठ्या अपेक्षेने लावलेला कांदा भिजल्याने त्याला कुज येण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे बाजारभावावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून तो शेतात वाळवण्यासाठी ठेवला होता, मात्र पावसाने हजेरी लावल्याने हा कांदा आता सडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, सध्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू असल्याने पंचनामे करण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अवकाळी पाऊस. प्रशासनासमोर मोठे आव्हान नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळणे आवश्यक असताना महसूल कर्मचाऱ्यांचा संप हा प्रशासनासाठी मोठा अडथळा ठरत आहे. पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत असून, शेतकरी आधीच संकटात असताना अशा तांत्रिक कारणांमुळे नुकसान भरपाई लांबणीवर पडणे चिंताजनक आहे. तहसीलदार यांचा इशारा याबाबत जुन्नरचे तहसीलदार बाळासाहेब सिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मागील गारपिटीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आता झालेल्या पावसाची माहिती मागवली जात असून, कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे केले जातील. सध्या सुरू असलेल्या संपाबाबत बोलताना ते म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पंचनामे करणे बंधनकारक असून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी हे काम केलेच पाहिजे, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरं जावे लागेल. “दोन दिवसांपूर्वीच कांदा काढून ठेवला होता, पण पावसाने सगळा कांदा भिजला. आता तो लवकर वाळणार नाही आणि बाजारातही योग्य भाव मिळणार नाही. आधीच खर्च वाढला आहे, त्यात आता हे नुकसान सोसावे लागत आहे.” – शिवाजी डुंबरे, शेतकरी.