Junnar Municipal Council : जुन्नर नगरपरिषदेत हायव्होल्टेज ड्रामा! ३ मिनिटांत सभा रद्द अन् राष्ट्रवादी आक्रमक; नेमकं काय घडलं?
नगर परिषदेच्या विषय समिती सभापती आणि सदस्यांच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष सभा शुक्रवारी (दि. २३) गणपूर्ती अभावी रद्द करण्यात आली.

Junnar Municipal Council – नगर परिषदेच्या विषय समिती सभापती आणि सदस्यांच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष सभा शुक्रवारी (दि. २३) गणपूर्ती अभावी रद्द करण्यात आली. जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी चरण कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र, ११ सदस्यांच्या आवश्यक उपस्थितीऐवजी सभागृहात केवळ ९ सदस्य हजर राहिल्याने सभेचे कामकाज होऊ शकले नाही. या गोंधळामुळे बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज आणि महिला बालकल्याण यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांचे गठन रखडले आहे.सभेला नगराध्यक्षा सुजाता काजळे, राष्ट्रवादीच्या गटनेत्या वैष्णवी पांडे यांसह केवळ ९ सदस्य उपस्थित होते.
शिवसेनेचे गटनेते विक्रम परदेशी यांनी सांगितले की, १३ जानेवारी रोजी झालेली उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया बेकायदेशीर असून त्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार शिवसेनेचे नगरसेवक आणि त्यांना संलग्न असलेले भाजपचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले.
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या गटनेत्या वैष्णवी पांडे यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत, अवघ्या ३ मिनिटांत सभा रद्द करणे हा लोकप्रतिनिधींचा अवमान असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.विशेष सभेचे कामकाज रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहातच बसून राहिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेत पोलिसांना पाचारण करण्यात आले. वारंवार पोलिसांच्या उपस्थितीत चालणारे नगर परिषदेचे कामकाज आणि राजकीय संघर्ष पाहून जुन्नरकर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नवीन नगरसेवकांकडून विकासकामांची अपेक्षा असताना केवळ राजकीय खेळी सुरू असल्याने शहराचे काम केव्हा सुरळीत होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.





