Junnar Election : महायुती आणि महाविकास आघाडीत फूट! पाचही पक्ष स्वतंत्र लढणार; नगराध्यक्षपदासाठी ‘पंचरंगी’ सामना

प्रभात वृत्तसेवा
जुन्नर – जुन्नर नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष आणि २० नगरसेवकांच्या निवडीसाठी निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत एकी असताना, जुन्नरमध्ये मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षित संवाद न झाल्याने हे तिन्ही पक्ष आपापल्या ताकदीने निवडणूक लढवत आहेत.
महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस (आय) यांच्यात एकमत न झाल्याने काँग्रेसने आघाडीतून बाहेर पडून आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले आहेत.महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष व २० नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे.
भाजप आणि शिवसेना युती होणे अपेक्षित असताना ती न होता, दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे आपले स्वतंत्र उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली आहे. थेट नगराध्यक्ष पदाकरिता शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस (आय) या पाचही पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवले आहेत. शुक्रवारी (दि. २१) उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत असून, या माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.





