Junnar Crime: सीतेवाडीत धक्कादायक प्रकार! पत्नीने स्टीलच्या पाईपने पतीला झोडला; नेमकं प्रकरण काय?
Junnar Crime: जुन्नर तालुक्यातील सीतेवाडीत कौटुंबिक वादातून पतीने घरात प्रवेश करताच पत्नीकडून स्टीलच्या पाईपने बेदम मारहाण; ओतूर पोलिसांत गुन्हा दाखल.

Junnar Crime – जुन्नर तालुक्यातील सीतेवाडी येथे कौटुंबिक वादातून पत्नीने पतीवर स्टीलच्या पाईपने मारहाण केल्याची घटना घडली. तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या इनोव्हा कारच्या पुढील काचेची तोडफोड केल्याचा प्रकारही समोर आला आहे. याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश दगडू गायकवाड (वय 48, व्यवसाय-शेती, रा. सीतेवाडी) हे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घरी आले. त्यावेळी घरात काही कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून त्यांची पत्नी धनश्री गायकवाड हिने स्टीलच्या पाईपने पतीच्या पाठीवर व मानेवर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच काचेच्या बाटल्या फेकून मारल्याने दुखापत झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, घटनेनंतर घराबाहेर उभ्या असलेल्या एमएच 14 जीए 9540 क्रमांकाच्या इनोव्हा कारच्या पुढील काचेची तोडफोड केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 228/2026 नुसार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळशीराम भवारी करीत आहेत.




