‘मोदी मुक्ती दिवस म्हणून ४ जून ओळखला जाईल…’; केंद्र सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर कॉंग्रेसचा पलटवार

नवी दिल्ली – संविधान हत्या दिवस जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर कॉंग्रेसने जोरदार पलटवार केला. मोदी मुक्ती दिवस म्हणून ४ जून ओळखला जाईल, असे त्या पक्षाने म्हटले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सरकारच्या निर्णयावर उपरोधिक शैलीत प्रतिक्रिया दिली. त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिवसाचा (४ जून) संदर्भ दिला.
देशातील जनतेकडून त्या दिवशी मोदींना निर्णायक व्यक्तिगत, राजकीय आणि नैतिक पराभव मिळाला. त्याआधी १० वर्षे मोदींनी अघोषित आणीबाणी लादली.
त्यांनी देशाची राज्यघटना आणि घटनात्मक सिद्धांत-मुल्यांवर, घटनात्मक संस्थांवर सुनियोजित पद्धतीने हल्ला केला. आता हेडलाईन बनवण्यासाठी ते पुन्हा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी म्हटले.
मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी नोटबंदी जाहीर केली. त्याचाही संदर्भ देऊन रमेश यांनी उपहासात्मक टिप्पणी केली. देशातील जनता दरवर्षी ८ नोव्हेंबरला उपजीविका हत्या दिवस साजरा करतील, असे त्यांनी म्हटले.





