Jubin Nautiyal Health Update : जुबिनला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई – प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल गुरुवारी त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली पडला. अपघातात त्यांची कोपर तुटली असून त्यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. याशिवाय गायकाच्या डोक्याला आणि कपाळावरही जखमा झाल्या आहेत. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वृत्तानुसार, अपघातानंतर झुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. जुबिनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याने स्वतः इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे.
जुबिनने हॉस्पिटलचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर बसलेला दिसत आहे. या फोटोत तो जेवण करतांना दिसत आहे. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती जुबिनने फोटोसह शेअर केली आहे. यासोबतच त्याने चाहत्यांसाठी एक नोटही लिहिली आहे.
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत जुबिन नौटियालने लिहिले की, ‘तुमच्या प्रार्थनेसाठी सर्वांचे आभार. देव मला पाहत होता आणि त्याने मला या गंभीर अपघातात वाचवले. मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि मी बरा होत आहे. तुमच्या अपार प्रेम आणि प्रार्थनेबद्दल मनापासून धन्यवाद.’





