2024च्या लोकसभा निवडणुकीची भाजपकडून जय्यत तयारी जे पी नड्डा, अमित शहा पोहोचले कोलकात्यात

कोलकाता – लोकसभा निवडणुक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मंगळवारी पहाटे कोलकाता येथे पोहोचले, हे नेते पश्चिम बंगाल मधील निवडणूक तयारीचा आढावा घेण्याबरोबरच पक्षाच्या उमेदवारांचीही चाचपणी करणार आहेत. आज दिवसभर त्यांनी बैठकांचे सत्र घेतले व राज्यातील भाजप नेत्यांशी संवाद साधला.
भाजपचे आमदार मनोज तिग्गा म्हणाले की, पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आमचे केंद्रीय नेते, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष राज्याला भेट देत राहतील त्यांचे दौरे नजीकच्या काळात वाढतील, असे टिग्गा यांनी विमानतळावर पत्रकारांना सांगितले.
शहा आणि नड्डा यांचे स्वागत करण्यासाठी भाजप पश्चिम बंगालचे अध्यक्ष सुकांता मजुमदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि खासदार दिलीप घोष हे राज्याचे नेते विमानतळावर उपस्थित होते. राज्यातील भाजप नेत्यांशी ते गुप्त चर्चाही करणार आहेत.





